नांदेड- दि ३ - रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला भावाने बहिणीचे रक्षण करावे म्हणून राज्यभरातील साडेपाच हजार निर्भयांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांना राखी पाठवून अनोख्या पद्धतीने रक्षणाची मागणी केली आहे.राखी पौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री, परिवहन मंत्र्यांना महिला एस.टी कामगारांचे विविध मागण्यासंदर्भात साकडे
राज्यात तोट्यात चाललेली एस टी महामंङळ covid-19 च्या महामारीमुळे आर्थिक गर्तेत रुतत चाललेली आहे. फक्त जिल्हांतर्गत चाललेली वाहतूक व सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करीत फक्त बावीस प्रवाशांची वाहतूक यामुळे एसटी महामंडळाचे उत्पन्नाचे स्त्रोत पूर्णपणे थांबले आहे. त्याचा विपरीत परिणाम म्हणून दोन महिन्यापासून एसटी कामगार वेतनापासून वंचित राहिलेला आहे. आधीच कमी पगार असलेल्या या कामगारापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न समोर उभा ठाकलेला आहे.
त्यात प्रशासन रोज वेगवेगळी परिपत्रके प्रसारित करून कामगारांची मानसिकता अधिक हतबल करीत आहे. या आर्थिक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी व कामगारांचे वेतन त्वरित अदा करण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या निर्भया समितीच्या महिला कामगार सदस्य यांनी मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना मदतीची विनंती केली आहे. राखी पौर्णिमाच्या भाऊ-बहिणीच्या पवित्र दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील निर्भया सदस्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व परिवहन मंत्री यांना राखी व निवेदन पाठवून कामगारांच्या प्रलंबित वेतनाचा प्रश्न तात्काळ निकाली काढण्याबाबत विनंती केलेली आहे. वेतनाचा प्रश्न त्वरीत सोडवावा ही ओवाळणी या मंत्रीमहोदयभावांनी निर्भयांना द्यावी अशी मागणी केलेली आहे.
राज्य महिला संघटक शिला नाईकवाडे यांच्या अभियानाअंतर्गत प्रत्येक विभागातून निर्भया प्रमुख या राखी व निवेदन पाठवणार आहेत अशी माहिती औरंगाबाद जिल्हा कामगार संघटना विभागीय कार्यालयाच्या महिला अध्यक्ष अरुणा चिद्री व उपाध्यक्ष साबेरा सिद्धिकी सौ. नालंदा धीवर सौ.पालवे सौ.पाटील व त्यांच्या सर्व सहकारी भगिनी यांनी दिली
No comments:
Post a Comment