![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiR7KutzuAKns3KhvBBRCqtkpA1hPhfi-bZXAtTXrogIF4KsydqaG1H2yHvyGCIwqCuYYB6CW_tPIhc2S9EvaFZlOobM-uONWoZICmv7XCBQ5b99KysTOVCQFaRafKBiYGfqcdH4o-EAlQ/w400-h267/download+%25281%2529.jpg)
धुळे : करोना विषाणूमुळे सर्वच जण त्रस्त आहेत. मात्र, कोरोना विषाणूची बाधा झाल्यावर योग्य वेळी वैद्यकीय उपचार घेतल्यास तो निश्चित बरा होतो. त्यामुळे कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तत्काळ रुग्णालयात जावून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आज येथे केले.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर अर्थात धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल एकूण 8 रुग्णांपैकी चार रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले. त्यात तीन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. त्यांना आज सकाळी टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करीत जिल्हाधिकारी श्री. यादव यांच्या उपस्थितीत डिस्चार्ज देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर चंद्रकांत सोनार, महानगरपालिका स्थायी समितीचे सभापती सुनील बैसाने, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी वैद्यकीय अधिकारी तथा कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. संजय शिंदे, डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. अभिषेक पाटील, डॉ. अभय शिनकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. यादव म्हणाले, की जिल्हा रुग्णालयातून चार रुग्ण कोरोनामुक्त होवून घरी जात आहेत. हा आनंदाचा दिवस आहे. ही घटना निश्चितच प्रेरणादायी आहे. त्यामुळे कोरोना विषाणूपासून योग्य वेळी उपचार घेतल्यास रुग्ण बरा होवू शकतो हा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जावू नये. कोरोना विषाणूच्या आजाराची प्रारंभिक लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तत्काळ वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आरोग्य विभाग अहोरात्र परिश्रम घेत आहे. त्यांना नागरिकांनाकडूनही चांगले सहकार्य मिळत आहे. माध्यमांनीही नागरिकांमध्ये कोरोना विषाणूविषयी जनजागृती केली. नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरण्याच्या सवयीमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास जिल्हा प्रशासनास यश आले आहे. त्याचाही फायदा झाला आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांनी आपली माहिती स्थानिक प्रशासनाला तत्काळ द्यावी. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखणे आणखी शक्य होईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी यापुढेही सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी केले.
महापौर श्री. सोनार यांनी करोना विषाणूपासून रुग्ण निश्चित बरा होवू शकतो, असे सांगत प्रत्येक नागरिकाने दक्षता बाळगावी, असे आवाहन केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी रुग्णांवर केलेल्या वैद्यकीय उपचारांची माहिती दिली.
करोनामुक्त रुग्णांना प्रमाणपत्र
कोरोना विषाणूपासून मुक्त झालेल्या रुग्णांना जिल्हा सामान्य रुग्णालय, धुळे यांच्यातर्फे प्रमाणपत्र देण्यात येवून पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच या रुग्णांना फळांनी भरलेली परडी भेट देण्यात आली.
जिल्हा सामान्य रुग्णालय हे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. या रुग्णालयात 50 खाटांची व्यवस्था आहे. करोना विषाणूच्या रुग्णांवर औषधोपचार केले जातात. त्यामुळे आज चार रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत.
डॉ. विशाल पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी तथा जिल्हा कोरोना नोडल अधिकारी, धुळे
————
धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातून चार रुग्ण आज करोना विषाणूपासून मुक्त होत आहेत. ही आनंदाची बाब आहे. रुग्णांशीही संवाद साधला. त्यांनी रुग्णालयातील सेवांबाबत समाधान व्यक्त केले आहे.
संजय यादव, जिल्हाधिकारी, धुळे
———–
करोना विषाणूची लक्षणे आढळून आल्याने दहा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालो होतो. या कालावधीत जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून दर्जेदार सुविधा मिळाल्या. वेळोवेळी तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. वेळेवर भोजन मिळाले. रुग्णालय आवारात स्वच्छता पाळण्यात येत होती. त्यामुळे आज करोना विषाणूपासून मुक्त झाल्याचा आनंद होत आहे.
– करोना विषाणूपासून मुक्त रुग्ण
No comments:
Post a Comment