शहरापासून ५ किमी हद्दीची मर्यादाही १० किमी पर्यंत वाढवणार! स्वाधार योजनेचा लाभ आता तालुकास्तरावर - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Thursday, May 28, 2020

शहरापासून ५ किमी हद्दीची मर्यादाही १० किमी पर्यंत वाढवणार! स्वाधार योजनेचा लाभ आता तालुकास्तरावर


अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना होणार लाभ-सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची माहिती

मुंबई : शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असूनही प्रवेश न मिळू शकलेल्या 11 वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना देण्यात येणारी स्वाधार योजना मोठी शहरे, महानगरपालिका, जिल्ह्याचे ठिकाण यापूरती मर्यादित न ठेवता आता तालुकास्तरावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

तसेच पूर्वीच्या शासन निर्णयाप्रमाणे शहरापासून 5 किमी हद्दीपर्यंत महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाच या योजनेतील सवलती लागू होत्या, ही मर्यादा आता 10 किमी पर्यंत वाढविण्यात येणार असल्याचेही श्री.मुंडे म्हणाले.

मंत्रालयात बुधवारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या संदर्भात घेतलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, सहसचिव दिनेश डिंगळे, समाज कल्याण आयुक्त प्रवीण दराडे, अवर सचिव अनिल अहिरे, आदिवासी विभागाचे उपसचिव श्री.शिंदे, कक्ष अधिकारी श्री.सरदार आदी उपस्थित होते.

11 वी – 12 वी व त्यापुढील व्यावसायिक व बिगर व्यवसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या, शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र परंतू प्रवेश न मिळू शकलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मुंबई, पुणे, नागपूर, नवी मुंबई, ठाणे आदी मोठ्या शहरांमध्ये वार्षिक रु. 60 हजार, इतर महसुली विभाग, क वर्ग महानगरपालिका आदी ठिकाणी वार्षिक रु. 51 हजार, तर इतर जिल्ह्याच्या ठिकाणी वार्षिक रु. 43 हजार इतकी रक्कम या योजनेअंतर्गत देण्यात येते.

ही योजना लागू असलेल्या शहर किंवा महानगरपालिकेपासून 5 किमी हद्दीपर्यंत असलेल्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकत होता, या अंतराची मर्यादाही आता 10 किमी पर्यंत वाढविण्यात आली आहे.

या निर्णयानुसार मोठी शहरे, महानगरपालिका तसेच जिल्हा स्तरावरुन आता तालुका स्तरावर विविध महाविद्यालयांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आता या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor