सरकारंमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त, लॉकडाऊन मध्ये मनोरुग्ण वाढले - प्रकाश आंबेडकर - WEEKLY VIJAY SANGRAM

Breaking

Thursday, June 25, 2020

सरकारंमुळे सर्वसामान्य लोकांचे जीवन उध्वस्त, लॉकडाऊन मध्ये मनोरुग्ण वाढले - प्रकाश आंबेडकर



साेलापुर-  दि, २५ - आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये डिझेल व पेट्रोलचे भाव उतरले असताना भारत देशात मात्र त्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सरकार म्हणजे संघटित गुन्हेगारांचे सरकार आहे. खडखडाट असलेली तिजोरी भरण्यासाठी पेट्रोल व डिझेलचे भाव वाढवले जात आहेत असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोलापुरात केला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. दरम्यान शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना हा देशात इम्पोर्ट म्हणजेच आयात केलेला जिवाणू आहे. ज्या कुटुंबात कोविडने बळी गेला असेल, त्या कुटुंबीयाने पंतप्रधानांवर 302 चा गुन्हा दाखल करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा कार्यक्रम घेण्यासाठी परदेशी लोकांना बंदी घालण्याऐवजी त्यांना परवानगी दिली. वास्तविक पाहता त्यांना मनाई करण्याची सूचना होती. तरीही त्यांना भारतात येऊ दिले. त्याचा फटका या देशाला बसला असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. लॉकडाऊनमुळे बारा बलुतेदारांच्या व्यवसायावर बंदी आली. आवश्यक असलेल्या वस्तूंचा व्यवसायच ठप्प झाला. बारा बलुतेदार व्यावसायिकांची उपासमार झाली. त्यांना काहीही दिले नाही. केंद्र सरकारच्या वीस लाख कोटीच्या पॅकेजमध्ये या बारा बलुतेदारांना स्थान नाही. शासन दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका आंबेडकर यांनी यावेळी केली. कोरोना महामारीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे मनोरुग्णांच्या संख्येत वाढ झाली. कोरोना महामारीच्या नावाखाली शासनाने सर्वसामान्य लोकांना ब्लॅकमेल केले आहे. त्यांचे आयुष्य उध्वस्त केले. आज बापात बाप नाही, लेकात लेक नाही, कोणी एकमेकांना घरात येऊ देत नाही, कोणी दुसऱ्याच्या घरात जात नाही. अशी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. तेव्हा शासनाची वाट सर्वसामान्य लोकांनी बघू नये. आपले आनंदी जीवन जगावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले. केंद्र व राज्यात राजकीय नेतृत्व नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. या प्रश्नाकडे म्हणूनच दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. या पत्रकार परिषदेस प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, नगरसेवक गणेश पुजारी ,बबन शिंदे, विक्रांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. सूचना केल्या. यावेळी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तसेच दिवंगत सागर उबाळे यांच्या कुटुंबीयांची घरी जाऊन भेट घेतली. त्यांची विचारपूस करून सांत्वन केले. त्यानंतर ते शहीद सुनील काळे यांच्या बार्शी या ठिकाणी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Popular Posts

Sponsor