- कन्टेन्मेन्ट क्षेत्र वगळून व्यापारी पेठेतील सर्व दुकाने, आस्थापनांनी शासन तरतुदींचे पालन करावे : जिल्हाधिकारी संजय यादव
- बाजारपेठेत खरेदीसाठी कोणत्याही स्वयंचलित वाहनास परवानगी नाही
धुळे : कन्टेन्मेन्ट क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील व्यापारी पेठातील सर्व दुकाने, विक्री करणाऱ्या आस्थापनांनी राज्य शासनाच्या तरतुदींचे तंतोतंत व काटेकोरपणे पालन करून तरतुदीप्रमाणे पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त व व्यापारी महासंघाचे प्रतिनिधी यांच्या समन्वयाने निर्धारित केलेल्या पध्दतीनुसार अंमलबजावणी करावी. बाजारपेठेत खरेदीसाठी कोणत्याही स्वयंचलित वाहनास परवानगी नाही, असे शासनाचे निर्बंध आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.
करोना (COVID 19) विषाणूच्या साथ संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण महाराष्ट्रात MISSON BEGIN AGAIN ची घोषणा केली आहे. धुळे जिल्ह्याला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात, जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात, मध्यप्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील सेंधवा गावात करोना विषाणूच्या संसर्गाची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. धुळे महानगरपालिका हद्दीत व जिल्ह्यातील अन्य तालुक्यात आतापर्यंत करोना विषाणूचे (COVID 19) १७७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला आहे, तर धुळे महानगरपालिका हद्दीत २३ प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. धुळे महानगरपालिका हद्दीत ११३ रुग्ण आढळून आले असून ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत महानगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने पाच जून२०२० पासून सुरू होणाऱ्या टप्पा क्रमांक २ बाबत अटी, शर्थी व विक्री दुकाने व आस्थापना सुरू करणेबाबत शिफारसी सादर केलेल्या आहेत.
करोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एका संक्रमित रुग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्याच्या संपर्कात आल्याने होत असल्याने त्यास प्रतिबंध व्हावा ही बाब विचारात घेवून जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, फौजदारी प्रक्रिया संहिता नुसार धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी कोविड 19 विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महानगरपालिकेने घोषित केलेले active प्रतिबंधित क्षेत्र वगळून पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.
त्यानुसार 5 जून 2020 पासून पुढील आदेशापर्यंत रुग्णालये, औषधे विक्रीची दुकाने, किराणा, फळे, भाजीपाला, कृषी विषयक सर्व प्रकारच्या आस्थापना, अतितातडीचे शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, सुरक्षा यंत्रणा व कायदा सुव्यवस्था हाताळणारी यंत्रणा, बँक यंत्रणा, महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा माहिती अधिकारी यांनी प्राधिकृत केलेले मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी, दूरध्वनी, इंटरनेट सेवा पुरविणारे अधिकारी व कर्मचारी, दूध विक्रेते व सर्व पेट्रोलियम पदार्थ विक्रीची वेळ सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंतची निश्चित करण्यात आली आहे.
तसेच कन्टेन्मेन्ट क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातील व्यापारी पेठेतील सर्व दुकाने, विक्री करणाऱ्या आस्थापना राज्य शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार तंतोतंत व काटेकोरपणे पालन करून त्यात नमूद तरतुदीप्रमाणे पोलिस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, व्यापारी महासंघाच्या प्रतिनिधींच्या समन्वयाने निर्धारित केलेल्या पध्दतीनुसार अंमलबजावणी करावी. या व्यवसायाच्या ठिकाणी राज्य शासनाच्या आदेशातील कोणत्यही अटी व शर्थीचा भंग केल्यास महानगरपालिा पोलिस प्रशासनाने अधिनियमातील तरतुदी व इतर कायदेशीर तरतुदीनुसार संबंधित व्यक्ती, दुकान, आस्थापनेवर तत्काळ कारवाई करावी.
या कालावधीत तीन चाकी व चारचाकी (टॅक्सी, कॅब, ॲग्रीगेटर, रिक्षा) वाहनांकरीता 1+2 व्यक्ती व दुचाकी वाहनांकरीता फक्त वाहनचालकांना अत्यावश्यक सेवेकरीताच परवानगी राहील. मात्र, कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुमचा वापर करता येणार नाही. तसेच कपड्यांची अदलाबदल किंवा परताव्यास परवानगी राहणार नाही. बाजारपेठेत खरेदीसाठी कोणत्याही स्वयंचलित वाहनास परवानगी असणार नाही. मात्र, सायकल वापरास परवानगी राहील. तसेच जिल्ह्यातील सर्व सलून दुकाने, स्पा सेंटर, ब्यूटी पार्लर, बार्बर शॉप यांना राज्य शासनाने प्रतिबंध केला आहे. सर्व प्रकारचे हॉटेल, बार (घरपोच सेवा वगळून), सिनेमागृहे, मॉल, व्यापारी संकुल, क्रीडा संकुल (सार्वजनिक वापर), स्वीमिंग पूल, सभागृहे, व्यायामशाळा, धार्मिकस्थळे, प्रार्थना स्थळे, शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संकुल, प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवण्या, रेस्टारंट बार, सामाजिक, राजकीय कार्यक्रम,व इतर आदरातिथ्य सेवा बंद राहतील.
हा आदेश हा सद्य:स्थितीत व भविष्यात कोव्हीड-19 प्रतिबंधित क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रास लागू राहणार नाही. या (Containment Area) प्रतिबंधित क्षेत्रात कन्टेन्मेंट अधिसूचनेनुसार घोषित प्रतिबंधानुसार अंमलबजावणी होईल. तसेच राज्य शासनाने संपूर्ण राज्यात रात्री 9 ते सकाळी 5 या कालावधीत संपूर्ण संचारबंदी आदेश लागू केलेले आहेत. ते जिल्ह्यातही लागू राहतील.
या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) (3) व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय योग्य त्या कायदेशीर कारवाईस पात्र राहील, तसेच शासनाचे आदेशात वेळोवेळी होणारे बदलाचे अधीन हे आदेश असतील असेही जिल्हादंडाधिकारी श्री. यादव यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment